तनवाणी यांचा केणेकरांना उपरोधिक सल्ला
जमिनीवर काम करणार्या कार्यकर्त्यांची उपेक्षा, राज्य कार्यकारणी वरील नेत्यांचा दबाव, परस्पर निर्णय घेणारी कोअर कमिटी यालाच भाजपात पक्ष शिस्तीचे नाव आहे. या शिस्तीत राहूनच शहराध्यक्षाने काम करावे, असा उपरोधिक सल्ला भाजपचे माजी शहराध्यक्ष व शिवसेननेत असलेले किशनचंद तनवाणी यांनी संजय केणेकर यांना दिला.
तब्बल सहा-सात महिन्यानंतर जाहीर झालेल्या भाजप शहर जिल्हा कार्यकारणी नंतर पक्षात वाद उफाळून आला आहे. खुद्द शहराध्यक्षच नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. प्रदेश कार्यकारिणीवर असलेल्या केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार तसेच 25 कोअर कमिटीच्या नेत्यांनी आपल्या समर्थकांचा भरणा कार्यकारणीत केला आहे. त्यामुळे आपल्या समर्थकांचीच वर्णी शहराध्यक्ष लावू शकले नाहीत. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष हे पद नामधारी आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजप पक्ष स्थितीचा जवळून अनुभव घेतलेले किशनचंद तनवाणी यांनी शहराध्यक्ष केणेकर यांना प्रेमाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, शहरात केंद्रीय मंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ते, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष अशी वजनदार स्थानिक नेते मंडळी भाजपात आहेत. त्याशिवाय तब्बल 25 नेते प्रदेश कार्यकारीणी वर आहेत. त्यांना आपापल्या कार्यकर्त्यांची सोय करायची असते. मनपा निवडणूक लक्षात घेता यादीवर त्यांचाच वरचष्मा दिसून येतो. दुसरीकडे संजय केणेकर हे प्रदेश कामगार मोर्चा अध्यक्ष होते. त्यामुळे शहरात कार्यकर्त्यांची फळी असण्याचे कारणच नाही. भाजपात सर्व निर्णय कोअर कमिटीच्या मार्फत होत असतात. त्यामुळे अध्यक्षांचे रुसवे-फुगवे पक्षासाठी खिजगणतीतही राहत नाहीत.
मनमोकळे करणारा नेता नाही!
भाजपात कार्यकर्त्यांचे मन जाणून घेणारा नेता सध्या नाही. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. नेते आणि कार्यकर्ते यांच्यात अंतर पडल्याने भाजपाची आजची स्थिती झाली आहे. जमिनीवर काम करणार्या कार्यकर्त्यांचा विचार पक्षात होत नाही. त्यामुळे नाराजी वाढली असल्याचे तनवाणी म्हणाले.
तनवाणीना घेरण्यासाठी...
भाजपच्या नव्या शहर कार्यकारिणीत मध्य मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. जातीय समीकरण साधत कचरू घोडके, राजेश मेहता, समीर राजूरकर, लता दलाल, महेश माळवतकर, नितीन चित्ते, जगदीश सिद्ध आदींना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. पूर्व मतदारसंघातही भाजपने महत्त्वाच्या पदांची खैरात वाटली. मात्र पश्चिम मतदारसंघात कडे लक्षही दिले नाही, असे दिसून येते.